-
*इमारत व इतर बांधकाम कामगारांना एरंडोल येथे तालुका स्तरावर भांडे संच वाटप करावेत, मागणी……..!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांना भांडे संच घेण्यासाठी इतर तालुक्यांच्या गावांना लांब अंतरावर जावे लागते.त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दिवसभर रांगेत उभे राहूनही संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी परतावे लागते.पुन्हा दुसऱ्या दिवशी भांडे संच घ्यायला जावे लागते.त्यामुळे सदर कामगारांचे हाल होत असून त्यांच्या रोजी रोटीच्या कामाला मुकावे लागते.अशा आशयाचे निवेदन एरंडोल कामगार मोर्चा संघटनेचे तालुकाध्यक्ष आनंद श्रीराम सुर्यवंशी यांनी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, जळगांव, सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
एरंडोल तालुक्यात एकूण ६५ गावे असून कामधंदा सोडून भांडे संच घ्यायला सदर कामगारांना दुसऱ्या तालुक्याच्या गावाला जाणे भाग पडते.तरी ही गैरसोय दूर करावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य कामगार मोर्चा कुमार नथ्थू सिरामे, भाजपा जिल्हा चिटणीस निलेश परदेशी, भाजपा कामगार मोर्चा एरंडोल तालुकाध्यक्ष आनंद सूर्यवंशी, भगवान मराठे, राहुल बडगुजर, भुषण बडगुजर, सागर भोई हे उपस्थित होते.