- एका आदिवासी परिवारातील विजेच्या धक्क्याने ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू . तर दीड वर्षाची दुर्गा नावाची चिमुरडी बचावली…..!
- एरंडोल – तालुक्यातील वरखेडी शिवारात विजेच्या धक्क्याने एकाच आदिवासी कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट २०२५ रोजी बुधवारी सकाळी उघडकीस आली.विशेष हे की शेतमालक बंडू युवराज पाटील रा.वरखेडी हे स्वतः बुधवारी सकाळी शेतावर गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या चारही बाजूस झटका तार टाकून त्यात शेतातल्या डि पी वरून अवैध विजप्रवाह सोडण्यात आला होता.ह्या झटका तारा रात्रीच्या वेळी न दिसल्यामुळे विजेचा धक्का लागून एकाच आदिवासी कुटुंबातील ५ जणांना मृत्यू झाला.सुदैवाने या दुर्घटनेत अवघ्या दिड वर्षाची चिमुरडी दुर्गा विकास पावरा ही बालंबाल बचावली.मृत व्यक्ती ह्या ओसरणी ता.खकना, जिल्हा बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश येथील मुळ रहिवासी असून ते त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पायी जात होते.मृतांमध्ये विकास रामलाल पावरा वय ४५ वर्षे,सुमन विकास पावरा पत्नी वय ४२ वर्षे,पवन विकास पावरा,मुलगा,कवल विकास पावरा मुलगा,सासू नाव समजून आले नाही.
दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता रामपाल गेडाम व कक्ष अभियंता उमेश वाणी यांनी अनाधिकृत वीजजोडणी केल्याबाबत पंचनामा केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.तसेच प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील यांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन घटनेबाबतची माहिती जाणून घेतली.
या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आले.