-
*एरंडोलचा झेंडा दिल्लीत फडकवला,आयएएस आकाश त्रिवेदी यांचा उद्या अभिमान व कर्तृत्वाचा भव्य ‘ नागरी सत्कार ‘……….!*
एरंडोल प्रतिनिधी – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एरंडोलच्या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७३ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. एरंडोलचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या आकाश ओम त्रिवेदी यांची ‘ भारतीय प्रशासकीय सेवे ‘ त निवड झाल्याबद्दल संपूर्ण शहराच्या व एरंडोल शहर व तालुका गौरव समितीच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
’अभिमान एरंडोलचा… सन्मान कर्तृत्वाचा ‘ या संकल्पनेखाली होणारा हा सोहळा गुरुवारी, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कॉलेज, म्हसावद नाका येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षपद आणि प्रमुख उपस्थिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील भूषवणार आहेत. तसेच एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल चिमणरावजी पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा कौतुक सोहळा पार पडेल.
आकाश त्रिवेदी यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एका छोट्या शहरातून जिद्दीच्या जोरावर देशातील सर्वोच्च परीक्षेत यश मिळवण्याचा त्यांचा प्रवास आगामी पिढीतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
एरंडोलच्या या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या लाडक्या सुपुत्राचे कौतुक करण्यासाठी सर्व शहरवासीय आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


