- एरंडोल येथे समांतर रस्त्यांवरील दिवेच काळोखात…..
एरंडोल – येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील बरीच कामे अजूनही थंड बस्त्यात आहेत.त्यात प्रामुख्याने समांतर रस्त्यांवर दिव्यांची असुविधा असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.विशेष हे की सध्या नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सारख्या अतिमहत्त्वाचे उत्सव व सणासुदीचे दिवस आहेत.त्यामुळे सर्वत्र विद्यूत रोषणाई करून प्रकाशमान वातावरण तयार होते.मात्र धरणगाव चौफुलीपासून ते तिवारी व्यापारी संकुलापर्यंत समांतर रस्त्यांवर काही ठिकाणी दिवे लावलेले आहेत परंतु ते दिवे प्रकाशमान करण्याचा मुहूर्त महामार्ग प्राधिकरणाला अजून सापडला नाही.
तसेच बसस्थानकापासून तिवारी व्यापारी संकुलापर्यंत दुभाजकाच्या जागी पोल उभे करण्यात आले आहेत.त्यांना अजूनही दिवे लावण्यात आलेले नाहीत.त्यामुळे दुभाजकाच्या जागी उभे केलेले खांब व समांतर रस्त्यांवरील सुरू न केलेले दिवे केवळ शोपीस ठरत आहेत.दिव्यांच्या या असुविधेमुळे सणासुदीच्या दिवसांत वाढलेली वाहनांची वर्दळ व मोठ्या संख्येने वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता प्रवाशांना अंधारातच गावात शिरतांना व बसस्थानकातून गावांत जातांना काळोखात चाचपडत जावे लागते.एकंदरीत हा प्रकार पाहता राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने चौपदरीकरणाच्या कामात काय दिवे लावले,दिवे लावले ते असे विना दिवे उभे केलेले खांब हा प्रकार नियोजन शुन्य नमुना तर नाही ना.अशी जनमानसातून चर्चा होत आहे.दिव्यांच्या या असुविधेमुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.