- एरंडोल येथे सालाबादाप्रमाणे मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य दीप महोत्सवाचे आयोजन
- एरंडोल:- शहरातील प्रसिद्ध मरी माता मंदिर देवस्थान तर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दीप महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात मंदिर परिसर दैवी प्रकाशाने उजळून निघाला.
संध्याकाळी मरी मातेस सविनय आरती व महापूजन करून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू झाला. शेकडो भक्तांनी हातात तेलाचे दिवे घेऊन माता मंदिर परिसरात दिव्यांची सजावट केली. दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचे सौंदर्य खुलून दिसत होते. रात्रीच्या वेळी कानुबाई मित्र मंडळ यांच्यातर्फे वही गायनाचा सांस्कृतिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ही जुनी परंपरा वही गायन काय असते हे आजच्या पिढीला समजावे यासाठी सदस्य भिका चौधरी, आधार महाजन, ओंकार रामू चौधरी, अजय महाजन, पंकज धनगर तुषार चौधरी चिंतामण चौधरी, अशोक चौधरी, आत्माराम पाटील, दिलीप बडगुजर भगवान बडगुजर, विक्रम पांचाळ, ईश्वर मराठे,नथु सुतार या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिश्रम घेत आहेत.
या प्रसंगी मंदिर देवस्थान समितीचे यशवंत बुंदले यांनी उपस्थित भक्तांचे स्वागत केले. महिलांसाठी विशेष उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरणाने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
या भव्य दीप महोत्सवामुळे एरंडोल शहरात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र ‘जय मरी माता’ चा जयघोष घुमत होता.
