-
*एरंडोल शहरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान………..!*
*सुमारे ४२३ श्रीसदस्यांचा सहभाग,२० टन कचऱ्याचे संकलन…..!*

एरंडोल प्रतिनिधी – तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) यांच्या वतीने आज १ मार्च २०२६ रोजी एरंडोल शहर आणि परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाद्वारे श्रीसदस्यांनी स्वच्छतेचा संदेश देत अवघ्या काही तासांत शहराचा कायापालट केला.
सदर अभियानाची सुरुवात सकाळी शहरांतील रा. ति. काबरे विद्यालयापासून करण्यात आली. एरंडोल नगरीचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना डॉ. ठाकूर यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि स्वच्छतेचा हा वारसा प्रत्येक नागरिकाने जोपासावा असे आवाहन केले.
सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेले हे अभियान सकाळी ११ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होते. यामध्ये प्रतिष्ठानच्या ४२३ श्रीसदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेल्या या मोहिमेत शहराच्या कानाकोपऱ्यातून कचरा संकलित करण्यात आला.
या अभियानात जवळपास २ टन ओला कचरा व १८.२५० टन सुका कचरा असा एकूण २० टन २५० किलो संकलित केलेला कचरा नगरपालिकेच्या १५ घंटागाड्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरक्षितपणे डंपिंग ग्राऊंडवर पोहोचवण्यात आला.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगभर वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य शिबिरे असे नानाविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. आजच्या अभियानातही श्रीसदस्यांची शिस्त आणि सेवाभाव पाहून एरंडोलकरांनी त्यांचे विशेष आभार मानले. ‘स्वच्छ एरंडोल, सुंदर एरंडोल’ चा नारा देत या मोहिमेची सांगता झाली.
