Home » सामाजिक » कलिंगड ने दिली अर्थगती..समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची दशसूत्री!शेतीतून आत्मनिर्भतेकडे.दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..

कलिंगड ने दिली अर्थगती..समूह शेतीतून महिला सक्षमीकरणाची दशसूत्री!शेतीतून आत्मनिर्भतेकडे.दिशान्तर चा महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी दशकपूर्ती वर्षात अर्ध्या कोटीपार..

 चिपळूण प्रतिनिधी–

शेती आतबट्ट्याची..शेतीत आता काही राम उरला नाही.. वर्षभर राबवून एक भात पीक मिळवायचं ते देखील पुरेसे नाही. यामुळे दोन दशकापूर्वीपासून लोक वेगाने शेती सोडू लागले आणि महानगराकडे धाव घेते झाले. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर दिशान्तर संस्थेने एका तपापूर्वी हाती घेतलेल्या उपजीविकेच्या कामाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. शेतीतून महिला शेती गटांनी लक्षवेधी उलाढाल केली. तर यावर्षी दशकपूर्ती साजरा करणाऱ्या वेहेळे- राजवीरवाडी येथील अन्नपूर्णा शेती गटाने ६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात यावर्षीचा ‘श्रम सन्मान’ २ लाख ९६ हजार ५१४ रुपयांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे दरवर्षीच्या केवळ चार महिन्यातील शेती कामातून गटाने सहा लाखांची उलाढाल केली. त्यातून श्रमसन्मान मोबदला घेऊन उर्वरित रक्कम पुढील हंगामासाठी ठेवण्यात आली आहे हे विशेष!

*आतबट्ट्याची शेती*
वर्षभर राबायचं आणि कमवायचं काय ते एक भात पीक! ते देखील आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकत नाही. पोटभरण्या व्यतिरिक्त जगण्यासाठीचे शिक्षण, आरोग्य, सण समारंभ, प्रवास असे इतर अनेक खर्च ‘आ’ वासून उभे ठाकलेले असतातच. शेतीत वर्षभर राबायच, गुरढोरे सांभाळायची. तरीपण उदरनिर्वाह होत नाही. यामुळे मग शेती आतबट्ट्याची.. शेतीत राम उरला नाही .. ही भावना दृगोचर होत गेली.

*स्थलांतरितांचा जिल्हा*
कुटुंबासह इथला माणूस शहर- महानगराकडे धाव घेता झाला आणि रत्नागिरी हा स्थलांतरितांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. कोकणातल्या शेतीमध्ये आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुकड्या तुकड्यांची शेती, पावसाळा सोडल्यास पाण्याचे दुर्भिक्ष्य, डोंगर उतारावरील गावे-वस्त्या, एकाच सातबारा मध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे.. या अशा अनेक प्रश्नांमध्ये इथला शेतकरी त्रस्त आहे. याशिवाय जे रब्बी हंगामात म्हणजे उन्हाळी हिवाळी शेतीसाठी प्रयत्न करतात अशा शेतकऱ्यांना उनाड गुरे, वणवे, वन्यप्राणी यांचे मोठे आव्हान आहे. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर वर्षभर शेतीत राबवून पावसाळ्यात म्हणजे खरीप हंगामातील केवळ एक भात पीक कमवायचं. त्यासाठी पशुधन सांभाळायचं आणि ‘संसार’ करायचा ही गोष्टच कल्पनेच्या पल्याड गेली होती. याचमुळे हे स्थलांतर होऊ लागले.

*शेतीतील पंचसूत्री*
दिशान्तर संस्थेने एका तपापूर्वी या साऱ्या गंभीर परिस्थितीवर कोणती उपाययोजना करता येईल या संदर्भाने मंथन केले. शेतीतील प्रमाद दूर करून फायदेशीर शेतीचा विचार केला. यासाठी शेतीतील नवी पंचसूत्री आणली. कोकणात सहकार रुजत नाही असं म्हटलं जातं. अशा ठिकाणी सहकारातून शेती, सामुदायिक शेती, आता शेतीमध्ये केवळ महिलाच काम करतात म्हणून महिलांकृत शेती. रासायनिक खते आणि फवारण्याने मानवी आरोग्यांना आरोग्याला गंभीर प्रश्न निर्माण केला. एवढेच नव्हे तर जमिनीचा पोत देखील बिघडला. या पार्श्वभूमीवर चौथा मुद्दा घेण्यात आला तो सेंद्रिय शेतीचा. आणि पाचवा मुद्दा होता दलाल मुक्त विक्री व्यवसायाचा.. म्हणजे शेतकरी पिकवेल आणि शेतकरीच विकेल.

*सहकार्याचा स्नेहार्द हात*
दिशान्तर ने काही गावातून महिलांचे शेती गट स्थापन त्यांना पॉवर टिलर, मोबाईल राईस मिल, मळणी यंत्र, ठिबक, पंप, पाईप यासह सेंद्रिय खत व कीडनाशक औषध निर्मिती अशा पद्धतीने सर्वतोपरी सहकार्याचा स्नेहार्द हात देण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक स्तरावर देखील शेतकऱ्यांना फळभाज्या रोप व बियाणांचे वितरण करण्यात आले.

*शिवार फेरीतून मार्केटिंग*
या सगळ्या उपक्रमाचा प्रारंभ चिपळूण तालुक्यातील वेहेळे- राजवीरवाडी येथून झाला. दिशान्तर ने शाश्वत उपजीविकेचा अन्नपूर्णा प्रकल्प या गावामध्ये महिला शेतकऱ्यांच्या साथीने उभारला. सहकारातून सामुदायिक शेती, महिलांकडून सेंद्रिय शेती आणि दलाल मुक्त विक्री व्यवस्था या तत्त्वानुसार इथे शेती करण्यात आली. इथल्या सेंद्रिय भाजीपाल्याची चव आणि एकूणच शेतकऱ्यांनी उभारलेलं हे काम पाहण्यासाठी चिपळूण शहर आणि परिसरातील नागरिक, ग्रामस्थ यांना शिवार फेरी घडवण्यात आली. याच्यापुढे शहरातील स्टॉलच्या मार्केटिंग अर्थात विक्री व्यवसायासाठी मोठा फायदा झाला.

*शेतीतलं सुवर्ण रूप!*
महिला शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टपूर्वक शेतीमध्ये काम सुरू केलं. दिशान्तर तर्फे मार्गदर्शन व सहकार्य म्हणून शेतीतले यंत्र, मंत्र, तंत्र यासह सर्वकाही देऊ करण्यात आलं. विविध प्रकारच्या पालेभाज्या वेलवर्गीय भाज्या, कडधान्य तसेच मुख्य म्हणजे पैसा मिळवून देणारा कलिंगड.. असं पीक शेतात डोलू लागलं. शेतीतील हे सुवर्ण रूप पाहून शेतकरी महिला हरखून गेल्या.

*’लक्ष’वेधी उलाढाल*
शिवार फेरीतील सहभागी मंडळींनी त्याचा मौखिक प्रचार आणि प्रसार केला त्याचा परिणाम चिपळूण शहरांमध्ये उभारलेल्या भाजी स्टॉलला प्रचंड प्रतिसादात झाला. दरवर्षीच्या केवळ तीन- साडे तीन महिन्यांमध्ये लक्षावधींची उलाढाल या महिलांनी केली. कोविड काळात तर दरवर्षी सात लाखांच्या सरासरीने उलाढाल झाली.

*अनंत अमुची ध्येयासक्ती!*
महिला शेतकऱ्यांच्या वाट्याला यादरम्यान, अनेक प्रसंग आले. कधी वणव्यामुळे शेत जाळलं गेलं तर उनाड गुरांच्या झुंडीने शेतीचं नुकसान केलं. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ असा निसर्ग फटका शेतीला बसला. कधी पडीक जमिनीच्या काही मालकांनी मोबदला देत असतानाही अचानक जमिनी नाकारल्या. जागतिक तापमान वाढ आणि त्याचे शेतीवर होणारे परिणाम हे गंभीर संकट. अशा साऱ्या विचित्र आणि विपरीत परिस्थितीत देखील महिला शेतकऱ्यांनी धीर सोडला नाही. त्या केवळ संकटाला सामोरे गेल्या नाहीत तर त्यांनी एकोप्याने त्या साऱ्यावर मात केली.

*स्व: मालकीचे वाहन*
चिपळूण मध्ये स्टॉल लावण्यात आला. तिथून भाजी, फळभाज्या तसेच कलिंगडची विक्री करण्यात आली. वेहेळे ते चिपळूण अशी दररोज भाड्याने गाडी करावी लागे. कधी गाडी वेळेत न येणे व भाड्याचा मोठा आर्थिक भुर्दंड.. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या वर्षातच या शेती गटाने स्वमालकीचे वाहन घेतले. स्टॉल व्यतिरिक्त ग्रामीण भागांपर्यंत फिरून भाजी, कलिंगड व भाजीपाला विक्री करिता या वाहनाचा चांगला उपयोग झाला.

*’कोटींचे’ *जल व्यवस्थापन*
शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक. अडरे येथील पाझर तलावातून वाहून जाणारे आणि वशिष्ठ नदीला मिळणारे पाणी कोणीही अडवत नव्हते. दहा वर्षांपूर्वी इथे जलरोधक बंधारा बांधण्यात आला. नदीतीलच गाळाचा यासाठी वापर करण्यात आला. माती मिश्रित रेती पोत्यांमध्ये भरून ती नदीपात्रामध्ये व्यवस्थितरित्या रचण्यात आली. तत्कालीन कृषी अधिकारी आर. के. जाधव व आत्म्याचे व्यवस्थापक पंकज कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गट व संस्थेने हे काम केले. या बंधाऱ्यात तब्बल १ कोटी २० लाख लिटर पाणी अडविले गेले. शेतीसाठी या पाण्याचा वापर झालाच पण; त्याहीपेक्षा परिसरातील विहिरींची जल पातळी वाढली. बोअरवेल या अधिकच पाणी देऊ लागल्या. दोन वर्षानंतर या ठिकाणी विविध मंडळे, अध्यात्मिक सेवा कार्य करणारे अशांच्या माध्यमातून या नदीवर विविध ठिकाणी बंधारे बांधण्याचे काम होऊ लागले. करोडो लिटरचे जल व्यवस्थापन इथे झाले. हा एकूणच पट्टा त्यामुळे जलसमृद्ध म्हणून गणला जाऊ लागला.

*दशकपूर्ती अन् साठ लाख*
दिशान्तर तर्फे पथदर्शी अन्नपूर्णा प्रकल्पाची निर्मिती २०१४ ला सुरू करण्यात आली. यापैकी एकाच गटाचा उदाहरण सांगायचं तर वेहेळे- राजवीरवाडी येथील महिलांनी दरवर्षीच्या रब्बी हंगामातील तीन ते चार महिन्यांमध्ये सरासरी ६ लाखांची उलाढाल केली. ग्रामपंचायत पासून चिपळूण पंचायत समिती ते जिल्हा कृषी विभागापर्यंत विविध स्तरावर त्यांचा सन्मान झाला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई येथे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
हे त्यांचे रब्बी शेतीतील दहावे वर्ष. तब्बल साठ लक्ष रुपयांची उलाढाल एका गटाने शेतीत करावी आणि त्यायोगे शेतीमध्ये पद, पैसा आणि प्रतिष्ठा असल्याचे सिद्ध करावे ही गोष्ट अवर्णनीयच.

*सक्षमीकरणाची दशसूत्री*
पिकाखालचं क्षेत्र झपाट्याने कमी होऊ लागलं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी शेतीकडे यावं हे केवळ सांगून चालणारं नव्हतं. तर शेतीमध्ये काहीतरी लक्षवेधी काम करण्याची आवश्यकता होती. शेतीमध्ये पंचसूत्री आणून दिशान्तर ने एक जबरदस्त काम साधलं. शेतीमध्ये पद, पैसा आणि प्रतिष्ठा असल्याचे अन्नपूर्णा प्रकल्पाने दाखवून दिल. एवढेच नव्हे शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी देखील विकसित केली. सहकारातून शेती, सामुदायिक शेती, महिलांकृत शेती, सेंद्रिय शेती, दलाल मुक्त विक्री व्यवस्था .. शेतीतील या पंचसूत्री तून महिला सक्षमीकरण, शेतीतून सन्मान, शेतीतून समृद्धी, सामाजिक अभिसरण, जल व्यवस्थापन.. अशी दशसूत्री तयार झाली.

*खेड्यांचे पुर्नजागरण!*
देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला अशी हाक दिली. औद्योगिक क्रांतीने मात्र खेड्यातील माणसांनी शहराची वाट धरली. शहरे- महानगरे तुडुंब भरली आणि खेडी ओस झाली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये गत एक तपाच्या परिश्रमाअंती दिशांन्तर संस्थेने खेड्याच्या पुर्नजागरणाचा हाती घेतलेला उपक्रम हा महत्त्वाकांक्षी ठरला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील शेती. या शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड, संस्थेच्या उडान प्रकल्प अंतर्गत ग्रामोद्योग.. यासह शिक्षण, आरोग्य, वस्ती विकास व उपजीविकेचे इतर स्त्रोत विकसित करीत दिशान्तर संस्थेने आपल्या परीने समृद्ध ग्राम निर्मितीचे काम हाती घेतले आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या सूत्रानुसार खेड्यांच्या पुर्नजागरणाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याची मनोभूमिका दिशान्तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी यानिमित्ताने मांडली. जगातील युद्धजन्य स्थिती, जागतिक वातावरण बदलाने उपजीविकेच्या स्त्रोतावर आलेले संकट अशा साऱ्या पार्श्वभूमीवर शेतीची आवश्यकता त्यांनी विशद केली. याचबरोबर हे दशक शेतकऱ्याला बळीराजा का म्हणतात हे दाखवणारे दशक असेल असे सूतोवाच केले

वेहेळे राजवीरवाडी येथील श्रम सन्मान कार्यक्रमाच्या वेळी तब्बल २ लाख ९३ हजार ५१४ रुपयांचे वितरण गटात करण्यात आले. यावेळी अन्नपूर्णा गटातर्फे शुभांगी राजवीर यांनी गत दहा वर्षाचा वाटचालीचा आढावा घेतला. ही वाटचाल आजही स्वप्नवत वाटते. हे सारं यश जितकं महिलांच आहे त्याहीपेक्षा ज्यांनी प्रेरणा आणि सर्वतोपरी सहकार्य केलं त्या दिशान्तर चे असल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. गटातील श्रृती राजवीर, सविता घाणेकर यांनी शेतीतून आम्ही महिला आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले.
व्यवहारातील पारदर्शीपणा, गटातील शिस्त, एकसंधपणा त्याचबरोबर आधीच्या अनुभवातून कामात.. यामुळे हे यश मिळू शकले. या प्रकल्पाची संकल्पना जेव्हा तयार करण्यात आली; तेव्हा त्याला इतके यश मिळेल असे वाटले नव्हते. आज या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पाहताना आनंद होतोय..असे दिशान्तर संस्थेच्या सचिव सीमा यादव यांनी म्हटले. तर नैसर्गिक व इतर संकटातही संघर्ष करत काम करत राहण्याची जिद्द, सातत्य व कष्ट या त्रिसूत्रीतू वेन हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिशान्तर संस्थेच्या खजिनदार शर्वरी साडविलकर-कुडाळकर यांनी व्यक्त केली. बुंदी लाडू चे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या