- *गिरणा नदीपात्रातून होणारी वाळू चोरी व अवैध गौण खनिजाचे उत्खन थांबवा, मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदन……..!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू चोरी होत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकते.तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन होत आहे.उत्राण,हणमंतखेडे,नागदुली,कढोली, वैजनाथ टाकरखेडा,दापोरी या गावांमधून गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे.वाळूमाफीया हे रात्री इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे बेसुमारपणे वाळूचा उपसा करून डंपर द्वारे रातोरात वाळूची विल्हेवाट लावत आहेत.हा गैरप्रकार त्वरित थांबवावा.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांनी तहसीलदार प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
गिरणा नदीपात्रातून अत्याधुनिक साधन सामुग्री वापरून वाळू चोरी होत असून त्यामुळे गिरणा नदीपात्र खोल होत आहे.अशीच वाळूचोरी होत राहिली तर नजीकच्या काळात परिसरातील विहीरींची पाणीपातळी खोल जाऊ शकते.तसेच गिरणा नदीकाठ परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजना या पाणी समस्येमुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.