-
एरंडोल प्रतिनिधी- तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन दळणवळण करणाऱ्या नागरिकांकडून खर्ची ते चोरटक्की व कढोली ते सावदा या रस्त्यांच्या दुरुस्तीची दीर्घकाळापासून जोरदार मागणी होत होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोलदादा पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या दोन्ही रस्त्यांच्या विकासकामांसाठी भरीव निधी मंजूर करून आणला.
कढोली ते सावदा रस्त्यावर जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २५ लक्ष रुपये, तर खर्ची ते चोरटक्की रस्त्यासाठी ४० लक्ष रुपयांची मंजुरी मिळविण्यात आली. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आज आमदार अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते या दोन्ही रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. मा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, मा. जि.प. सदस्य नाना महाजन, तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, धरणगाव बाजार समिती संचालक देविदास चौधरी सर, टोळीचे मा. सरपंच बाळासाहेब पाटील, खेडीचे मा. सरपंच पन्नाभाऊ सोनवणे, रवंजे येथील नाना कोळी, संदीप पाटील यांच्यासह कढोली, खर्ची (खु.), खर्ची (बु.), सावदा व पंचक्रोशीतील शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्यांची मागणी माजी आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या कार्यकाळापासून होत होती. त्यांच्या माध्यमातून आवश्यक तो पाठपुरावा झाला होता. त्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून सद्यस्थितीत निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक शेतजमिनींना योग्य रस्त्यांचा अभाव असल्याने शेतीकामातही अडथळे निर्माण होत होते. मात्र आता या विकासकामांमुळे नागरिकांचे दळणवळण सुलभ होणार असून वर्षानुवर्षांच्या समस्या कायमच्या सुटणार असल्याचे मत आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, “मा. आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी ३२०० हून अधिक कोटींचा विकासकामांना मंजुरी मिळाली असून, यामध्ये सिंचन व रस्त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. दोन गावांना जोडणारे पूल, शेत रस्ते यांसह अभूतपूर्व कामे झाली आहेत. येत्या काळातही दळणवळण, सिंचन व सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख कामे सातत्याने सुरू राहतील.”
