- *बसमध्ये हरवलेली महत्त्वाचे आर्मीचे कागदपत्रे असलेली पिशवी प्रवासी माजी सैनिकाला परत,एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षपणा…….!*
![]()
एरंडोल प्रतिनिधी – एसटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना जागृत ठेवल्याची प्रचिती नुकतीच आली आहे.एरंडोल तालुक्यातील भालगांव येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक नामदेव आत्माराम पाटील हे १९ मार्च २०२५ रोजी एरंडोल येथे शेगाव – शिर्डी बसमधून उतरतांना आपली महत्वाची आर्मीची कागदपत्रांची पिशवी बसमध्येच विसरले.ही बाब बस निघून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले.नामदेव पाटील यांनी तातडीने बसस्थानक निरिक्षक गोविंदा बागुल यांच्याशी संपर्क साधला.गोविंदा बागुल यांना तिकिटावरून सदर बस खामगाव डेपोची असल्याचे लक्षात आले.त्यांनी तेथील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून शेगांव शिर्डी बसच्या चालकाचा फोन नंबर मिळवला.वाहकाशी संपर्क साधला असता माजी सैनिक नामदेव पाटील यांची महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी सुरक्षित असल्याचे सांगितले.
उद्या एरंडोल बसस्थानकात शिर्डी – शेगाव बस आल्यावर कागदपत्रांची पिशवी आम्ही तुम्हाला सुपुर्द करू.असे वाहक मनोज हिरे ( क्र.१३४२ )व चालक विजय बारी ( क्र.२५४६१ )यांनी सांगितले.याप्रसंगी बसस्थानक व्यवस्थापक गोविंदा बागुल यांचे मनोमन आभार मानले.२० मार्च २०२५ रोजी शिर्डी – शेगांव बस एरंडोल बसस्थानकात आल्यावर वाहक मनोज हिरे व चालक विजय बारी यांनी माजी सैनिक नामदेव पाटील यांची हरवलेली कागदपत्रांची पिशवी त्यांना परत केली.
यावेळी वाहक मनोज हिरे व चालक विजय बारी या दोन्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यतत्परतेबद्दल एरंडोल बस आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक पी.यु.बाविस्कर व माजी सैनिकांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी वाहतूक नियंत्रक नाझीम शेख, माजी सैनिक कृष्णा महाजन, अरूण मराठे व नामदेव पाटील हे उपस्थित होते.