-
*भाजप आणि महायुतीस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या पटलावर नवे पान लिहिण्याची सुवर्णसंधी!*
*लाडकी बहीण पहिली ओबीसी मुख्यमंत्री होणार काय?**लाडके भाऊ संधीचे सोने करणार की घालवणार?*
*नाशिकरोड (प्रतिनिधी)* – काँग्रेसने देशाला पंतप्रधान आणि राष्ट्रपती होण्याची संधी अनुक्रमे इंदिरा गांधी (उत्तर प्रदेश) आणि प्रतिभाताई पाटील (महाराष्ट्र) यांना दिली. लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने राबडीदेवी यांना मुख्यमंत्रीपद देऊन बिहार राज्याला महिला मुख्यमंत्री दिला. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी या दीर्घकाळ मुख्यमंत्री आहेत. तामिळनाडू मध्ये जयललिता या मुख्यमंत्री होत्या. जम्मू आणि काश्मीर मध्ये मुफ्ती मेहबूबा यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती. पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री यावेळी लाभावा, अशी मागणी *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संस्थापक मिलिंद कुमार सोनार, अन्य सहसंस्थापक सर्वश्री राजाभाऊ सोनार, शांतारामशेट दुसाने, विकास शांताराम विसपुते, आत्माराम ढेकळे, दिनेश येवले अर्चनाताई सोनार, विलासराव अनासाने, अशोकराव हिरुळकर, दिलीपराव महतकर, बालाजी सुवर्णकार, सुधाकरशेट भामरे, विवेक विभांडीक, संजय नारायण तळेकर, ॲड अरुणराव सागळे, पुष्पाताई भामरे आदींनी केली आहे. पुणे येथील *स्त्री शक्ती फाऊंडेशन* ने देखील या मागणीचे समर्थन केले आहे.
या महिन्यात महाराष्ट्रात नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक ही मावळत्या (अर्थात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि अन्य घटक पक्षांच्या) महायुती सरकारने आणलेल्या *लाडकी बहीण* योजनेमुळे विशेष गाजली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी या महायुतीच्या विजयाच्या तारणहार ठरल्या. या निवडणुकीत भाजप १३२ जागांवर विजय मिळवून मोठा भाऊ ठरला, शिवसेना (शिंदे गट) ५७ जागांवर विजय मिळवून मधला भाऊ ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लहान भाऊ ठरला. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्रातील महिला मतदारांनी (लाडक्या बहिणींनी) अभूतपूर्व सहभाग घेऊन मतदानाधिकार बजावला.
माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढविली, ते मावळते मुख्यमंत्री एकनाथभाऊ शिंदे हे तिन्ही भाऊ लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची संधी देतील काय, हा औत्सुक्याचा विषय ठरेल.
यावेळी महिला मुख्यमंत्री झाल्याचे महाराष्ट्रातील जनतेस, विशेषत: महायुतीच्या विजयाच्या तारणहार ठरलेल्या लाडक्या बहिणींना आवडेल, अशी चर्चा जनमानसात उमटत आहे.महाराष्ट्रात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कर्तव्यदक्षतेने भूमिका बजावणाऱ्या, विधान परिषद (राज्यपाल नियुक्त) सदस्य आ. चित्राताई वाघ किंवा पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडून आलेल्या आ. माधुरीताई मिसाळ यांनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्यास राज्यातील जनतेत, विशेषत: ओबीसी प्रवर्गात आनंदाची लहर निर्माण होईल, असा सूर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये उमटत आहे.
आ. चित्राताई वाघ किंवा आ. माधुरीताई मिसाळ यांना मुख्यमंत्री पदाची संधी देऊन महायुतीतील देवेंद्रभाऊ फडणवीस, एकनाथभाऊ शिंदे आणि अजितदादा पवार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे नवे पान लिहावे, अशी मागणी ओबीसी प्रवर्गातील सोनार समाजाने केल्यास वावगे ठरू नये, अशी माहिती *सकल भारतीय सोनार समाज संघटन* चे संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांनी केली आहे.