-
*राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक एरंडोल येथील गटारींसह समांतर रस्त्यांच्या कामाची पाहणी करणार……..!*
एरंडोल प्रतिनिधी – महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांची जळगांव कार्यालयात भेट घेऊन समांतर रस्त्याची रुंदी कमी असल्याची तक्रार करण्यात आली.तसेच बी एस एन एल ऑफिस जवळ व अमळनेर नाक्याजवळ बोगद्याचे काम कधी होणार? याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.साळुंखे यांनी सदर शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन निवारण करण्यासंदर्भात प्रत्यक्ष एरंडोल येथे भेट देणार.असे आश्र्वासित केले.
बी एस एन एल कार्यालयाजवळ पिंप्री रस्ता असून हा रस्ता थेट अंजनी थडी व गुजर थडीच्या गावांना ये जा करण्यासाठी कमी अंतराचा मार्ग आहे.तसेच एरंडोल येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या रस्त्यालगतच्या परिसरात आहेत.त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांची या मार्गाने अहोरात्र रहदारी सुरू असते.अशा स्थितीत महामार्गावर बोगद्या अभावी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी याठिकाणी बोगदा होणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
अमळनेर नाका परिसरात सुध्दा बोगद्या अभावी याठिकाणी अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत.संतप्त जमावाने महामार्ग खोदून चारी करण्याची घटना याठिकाणी घडली आहे.विशेष हे की अमळनेर नाका परिसराच्या पश्चिम भागात जवळपास २५ ते ३० लहान मोठ्या वसाहती आहेत.तसेच नंदगांव रस्त्यालगतच्या परिसरात एरंडोल येथील शेतकऱ्यांची शेतजमीन या भागात आहे.त्यामुळे शेतकरी व शेतमजूर,नागरिक,शाळकरी मुले, वृध्द या सर्व घटकांच्या जिवीताला या स्थळावर धोका होण्याचा संभव आहे.अशी माहिती प्रकल्प संचालक यांच्या पुढे मांडण्यात आली.
पिंप्री फाटा व पिंपळकोठा खु.फाटा हे ठिकाण महामार्गावरील अपघातस्थळ बनले आहे.याठिकाणी आणखी किती निष्पाप लोकांचे बळी जाण्याची प्रतिक्षा करणार.असा संतप्त सवाल पिंप्री बु.,पिंप्री प्र.चा.व पिपळकोठा खु.येथील ग्रामस्थांनी केला आहे.
