- लाडकी बहिण योजनेची मुदतवाढ झाल्याने बॅंकांमध्ये महिलांची उसळली गर्दी…!
एरंडोल – शासनाकडून लाडकी बहिण योजनेची १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ केल्याने येथे बॅंकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे काउंटरजवळ उभे राहायला सुध्दा जागा राहत नाही.एवढेच नव्हे तर बॅंकांचा दरवाजा अर्धवट बंद करून महिलांना क्रमाने आत प्रवेश दिला जातो.त्यामुळे बॅंकांच्या बाहेर महिलांची लांबच लांब रांग दिसून येत आहे.बराच वेळ रांगेत उभे राहूनही योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची होणारी धावपळ ही वाखाणण्याजोगी आहे.
एरंडोल येथे सोमवार हा खुलता वार असल्याने दोन दिवसांच्या सुटीनंतर बॅंकांमध्ये महिलांची रिघ लागली होती.लाडकी बहिण योजनेची मुदत वाढल्यामुळे काही महिला कागदपत्रे देण्यासाठी,तर काही महिला योजनेच्या लाभाचे पैसे काढण्यासाठी,काही महिला के वाया सी करण्यासाठी, काही महिला संपर्क फोन नंबर बदलण्यासाठी अशा अनेक कामांकरिता महिलांची बॅंकांमध्ये गर्दी उसळली आहे.मात्र या गर्दीमुळे महिलांचे हाल होत आहेत.
आधी उल्हास त्यात फाल्गुन मास या उक्तीप्रमाणे निवृत्ती वेतन धारक, शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी हे सुध्दा बॅंकांमध्ये जात असल्यामुळे एकंदरीत बॅंकाना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.नोटाबंदीच्यावेळी याप्रमाणे बॅंकांसमोर लांबच लांब रांगा लागत होत्या.त्यानंतर पुन्हा एकदा बॅंकांसमोर गर्दी दिसून येत आहे.एकंदरीत महिला व लाभार्थी यांची कामांची पुर्तता करतांना बॅंक अधिकारी व कर्मचारी यांची दमछाक होत आहे.