- ‘ *लातूर भूकंपातून शिकताना ‘ कॉमिक पुस्तकाचे आय आय टी मुंबई येथे प्रकाशन, आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल……….!*
एरंडोल प्रतिनिधी – जागतिक आपत्ती जोखीम धोके निवारण दिनाचे औचित्य साधून, विवेकानंद कदम लिखित ‘लातूर भूकंपांतून शिकताना’ या महत्त्वपूर्ण कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आयआयटी मुंबई येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात उत्साहात पार पडले. प्रा. डॉ. रवी सिन्हा यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले.
प्रा. डॉ. रवी सिन्हा यांनी हे पुस्तक नवीन पिढीसाठी एक ‘ महत्वपूर्ण पर्वणी ‘ असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या मनातील भूकंपाची भीती दूर करून जनजागृती करण्याचे हे एक प्रभावी साधन ठरेल. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात हे पुस्तक पोहोचले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कॉमिक पुस्तकात लातूर भूकंपाची सविस्तर माहिती तसेच भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी चित्रांतून अत्यंत सोप्या भाषेत मांडण्यात आली आहे.हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल आणि भूकंपापासून बचाव करणारी पिढी घडविण्यात हे महत्त्वाचे ठरेल.असा विश्वास डॉ. सिन्हा यांनी व्यक्त केला.
विवेकानंद कदम यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, एरंडोल येथील प्रांजल महेश चौधरी-महाजन यांनी चित्रे रेखाटली आहेत. ‘ पाटकर पब्लिकेशन ‘ पालघर हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
या प्रकाशन सोहळ्याला प्रा. अलोक गोयल, प्रा. कपिल गुप्ता (आयआयटी मुंबई), शिवाजी बिबराळे (सचिव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य), उमेश शिर्के ( विभागीय आपत्ती व्यवस्थापक समन्वयक कोकण विभाग),दीपक शिंदे (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुंबई उपनगर)यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच दीपक तोंडारे, राजू बिबराळे, सुनीता बिबराळे, वैभव बिबराल, शैलेंद्र सोनी, सोनम सोनी, मोनी गुप्ता, हरीश कारभारी आणि सचिन जोसेफ इत्यादी मान्यवर सुध्दा उपस्थित होते.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि जनजागृतीच्या दिशेने एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.या पुस्तक निर्मितीत गोविंद बोडके (तत्कालिन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर), सुभाष भागडे (निवासी उपजिल्हाधिकारी), डॉ. प्रमोद पाटील (पीएच. डी. मार्गदर्शक) आणि एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन मनोर (निवृत्त शिक्षक) यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.