-
*कवी डॉ.म.सु.पगारे यांच्या ‘बा, तथागता’ या मराठी विशाल काव्याच्या अहिराणी अनुवादासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांना प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जाहीर,अहिराणी साहित्य परिषदेची घोषणा…….!*
एरंडोल (प्रतिनिधी):
अहिराणी बोलीचा प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अहिराणी साहित्य परिषदेने सन २०२४-२५ या वर्षासाठीच्या विविध प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात, क.ब.चौ.उ.म.वि च्या भाषा प्रशाळा व संशोधन विभागाचे प्रमुख तथा मानवतावादी विचारवंत डॉ.म.सु.पगारे लिखित मराठी ‘बा, तथागता’ या अडीचशे पानी एकाच कवितेचे एरंडोल येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांनी केलेल्या अहिराणी अनुवादाला कै. सुरेश गंगाराम पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा अनुवाद विभागातील पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. वा.ना.आंधळे यांच्या या यशाने एरंडोल शहराच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहिराणी साहित्यात कार्यरत असलेल्या आणि बोलीतून लेखन करणाऱ्या साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी विविध दात्यांच्या पुढाकाराने हे पुरस्कार दिले जातात. स्वर्गीय आमदार प्राचार्य सदाशिवराव माळी यांनी स्थापन केलेली ही परिषद गेल्या २० वर्षांपासून अहिराणी साहित्यातील कथा,काव्य, कादंबरी, अनुवाद, ललित साहित्य अशा विविध प्रकारातील लेखकांना प्रोत्साहन देत आहे.पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अहिराणी बोलीत लेखन करणाऱ्या लेखकांकडून पुस्तके मागवण्यात आली होती. परिषदेने प्रा. रमेश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या निवड समितीने या प्राप्त पुस्तकांमधून एकमताने निवड केली. या समितीत प्रा. फुला बागूल, रवींद्र वाणी, प्रकाश महाले, रत्ना पाटील यांचा समावेश होता. साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. भगवान पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकारीणी बैठकीत प्रा. रमेश राठोड यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
प्रा. वा. ना. आंधळे यांच्यासह इतरही अनेक साहित्यिकांना विविध विभागांमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये प्रमुख पुरस्कारप्राप्त साहित्यिक पुढीलप्रमाणे आहेत.कादंबरी (‘वडांग’) प्राचार्य डॉ. संजीव गिरासे,काव्य लेखन (‘तिनि दुनिया’) प्रभाकर शेळके,काव्य लेखन (‘हिरिदना बोल’)प्राचार्य डॉ. सुमती पवार,कथासंग्रह (‘भवरा’) प्रा. डॉ. ज्ञानेश दुसाने,ललित गद्य (‘वाघाडीना शानोभो’) ज्ञानेश्वर भामरे
या सर्व पुरस्कारांचे वितरण २३ नोव्हेंबर २०२५ रोजी धुळे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते एका समारंभपूर्वक सोहळ्यात केले जाणार आहे, अशी माहिती कार्यकारीणी सदस्य रवींद्र वाणी यांनी दिली.जेष्ठ साहित्यिक, प्रकाशक आणि कार्यकारीणी मंडळाच्या सदस्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. प्रा. वा. ना. आंधळे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे एरंडोल शहराचा मान आणि शान वाढली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली
