एरंडोल – येथे कमल लाॅन्स व रा.ति.काबरे विद्यालयात २६ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुक कामी नेमणूक केलेले अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशिक्षणाचा पहिला वर्ग घेण्यात आला.या प्रशिक्षण वर्गास एकूण २९८ मतदान केंद्रासाठी १७१० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या प्रशिक्षण वर्गास ९५ अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते.सदर गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येतील अशी माहिती एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक यंत्रणेच्या सुत्रांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एरंडोल प्रदीप पाटील,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पारोळा उल्हास देवरे यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.प्रशिक्षण सत्रात नियुक्त अधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीचा भाग म्हणून निवडणूक कामकाजासंबधी पेपर सोडवून घेतला.यावेळी यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक करून घेतले.