- तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचा न्यायालयीन आदेश पारित
एरंडोल;-येथील जुम्मा मशीद ट्रस्टच्या अफरातफर केल्या कामी तत्कालीन तपास अधिकारी बाळासाहेब केदारे यांना फेर तपास अर्जा कामी कारणे दाखवा नोटीसी द्वारे सविस्तर खुलासा दाखल करण्याचे न्यायालयीन आदेश पारित करण्यात आले आहेत.
एरंडोल येथील जुम्मा मशीद ट्रस्ट कामी संस्थेच्या शासकीय रकमांचा अफरातफर व फसवणूक झाल्याबाबत आक्षेप घेऊन संस्था अध्यक्ष अल्ताफ खान, नय्युम खान पठाण यांनी एरंडोल न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी खटल्या कामी सी आर पी सी कलम १५६/३ नुसार आदेश झाल्यामुळे चिरागोद्दिन शेख हुसेन व शेख इस्माईल शेख अमीर या दोघांविरुद्ध रीतसर गुन्हा
दाखल करण्यात आला. एरंडोल न्यायालयात फौजदारी खटला नंबर ३४/१८ नुसार दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे. संबंधित खटला सरकारी वकीलामार्फत न चालविता फिर्यादीच्या मर्जीनुसार सीनियर एडवकेट मोहन बी शुक्ला यांच्यामार्फत न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान खटल्याचे मूळ फिर्यादी अल्लाफ खान पठाण यांनी निशाणी २८ नुसार खटल्याचे तपास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक खटल्यात संपूर्ण घटनांचा तपास न करता वा कोणतेही अस्सल दस्तऐवज ताब्यात न घेता, अफरातफर ची नमूद लाखो रुपयांची रक्कम आरोपींचा रिमांड मंजूर होऊनही तपासा दरम्यान हस्तगत न केल्यामुळे गुन्ह्या कामी पुन्हा जास्तीचा व पुढील तपास करण्याचे आदेश होऊन अतिरिक्त दोषारोप पत्र दाखल करण्याचा आदेश पारित होण्यासाठी विनंती अर्ज केले असता न्यायालयीन संबंधित तपास अधिकारी व शासकीय अभियोक्ता यांचे म्हणणे व खुलासा दाखल करण्याचा आदेश होऊनही गुन्ह्याचे तपास अधिकारी बाळासाहेब केदारे यांनी व्यक्तिगत खुलासा दाखल करणे आवश्यक व क्रमप्राप्त असूनही सध्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी खुलासा दाखल केल्यामुळे ११ डिसेंबर २०२४ रोजी एरंडोल न्यायालयाचे न्यायमूर्ती इ.के चौगुले यांनी केदारे सेवानिवृत्त झाल्याबाबत न्यायालयासमोर स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या सविस्तर रहिवासाचा पत्ता पोलीस स्टेशनला सुस्पष्ट सूचना व निर्देश देऊन केदारे यांना फेर तपास मागणी अर्जा कामी ८ जानेवारी २०२५ रोजी अथवा तत्पूर्वी न्यायालयात न चुकता खुलासा व म्हणणे दाखल करण्याचे निर्देश व आदेश पारित केलेले आहेत.
खटल्या कामे फिर्यादी तर्फे एडवोकेट मोहन बी शुक्ला हे कामकाज पाहत आहेत.