-
*नागरिकांची सुरक्षितता व सुरळीत वाहतूकीसाठी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकणाच्या अपुर्णावस्थेतील कामे तातडीने पूर्ण करा, एरंडोल शहर संघर्ष समितीचे नही ला निवेदन…..!*
एरंडोल – शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या अपुर्णावस्थेतील कामांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून वाहतुकीच्या अडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे अमळनेर नाक्यापासून ते दत्तमंदिरापर्यंत समांतर रस्ते तसेच अमळनेर नाक्या पासून ते दत्तमंदिरापर्यंत पथदिवे लावण्याच्या प्रमुख मागणी सह राष्ट्रीय महामार्गाची अपुर्णावस्थेतील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निवेदन १९ डिसेंबर २०२४ रोजी प्रकल्प संचालक श्री शिवाजी पवार यांना एरंडोल शहर संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष रवींद्र लाळगे,उपाध्यक्ष नामदेव पाटील व इतर पदाधिकारी यांनी दिले.
सदर निवेदनातील एरंडोल शहरालगतच्या या महामार्गाची अपुर्णावस्थेतील कामे व समस्यांवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.अमळनेर नाक्यापासून ते एरंडोल बस स्थानक व पुढे दत्त मंदिर पुलापर्यंत समांतर रस्ते तयार करावेत.शहरातील बी एस एन एल कार्यालयाजवळ तसेच कासोदा चौफुली येथे अंडरपास तयार करून होणारे अपघात टाळावेत ,धरणगाव चौफुली येथे धरणगावच्या दिशेने हाय मास्ट लॅम्प बसविण्यात यावा.कृष्णा हॉटेल ते दत्त मंदिरा पर्यंत सलग पथदिवे बसवावेत व तात्काळ सुरु करावेत. सुचना फलकावर शुद्ध मराठीत लेखन असावे जसे पद्माळय,एरंडोळ येथे ळ ऐवजी ल असावा.शहरात राष्ट्रीय महामार्गालगतच्या गटारी पुर्ण कराव्यात त्यावरील तुटलेले ढाबे तात्काळ दुरुस्त करावेत.गतिरोधक नियमानुसार योग्य असावेत त्यांना रंग देण्यात यावा.
महामार्गाची अपुर्णावस्थेतील कामे व समस्या याकडे शासन व प्रशासन हेतुत: दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही बाब अतिशय गांभीर्याने घ्यावी.या आधी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे बरेच अपघात होऊन जिवितहानी झालेली आहे.प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास एरंडोल शहर संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
सदर निवेदनावर अध्यक्ष रवींद्र लाळगे,उपाध्यक्ष नामदेव पाटील,सचिव स्वप्नील सावंत,कोषाध्यक्ष दिनेश चव्हाण, संचालक ॲड.दिनकरराव पाटील, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, नानाभाऊ मिस्तरी, आर. झेड. पाटील,प्रविण महाजन,प्रमोद महाजन,बाविस्कर, राजेंद्र महाजन, गजानन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन त्वरित कार्यवाही होईल असे आश्वासन दिले.