- *एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन अपघातात गंभीर जखमी,प्रकृती चिंताजनक,अपघात की घातपात..नागरिकांमध्ये चर्चा……..?*
एरंडोल – येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते दशरथ बुधा महाजन हे दुचाकीने भालगांव – बोरगांव रस्त्यावरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.ही घटना १२ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.त्यांना उपचारार्थ जळगांव येथील न्युक्लीयस हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.याप्रकरणी दशरथ महाजन यांच्या धर्मपत्नी कल्पना दशरथ महाजन यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान महाजन यांचा घातपात झाल्याचा दाट संशय त्यांच्या धर्मपत्नी कल्पना दशरथ महाजन यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
दशरथ महाजन हे १२ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव महाजन,रा.भालगांव यांचे सह पोल्ट्रीच्या बांधकामांच्या ठिकाणी भराव करणे कामी मुरूमची आवश्यकता असल्याने मुरूम पाहण्यासाठी सि टी १०० बजाज कंपनीच्या एम एच १९ ई एच ९१५१ क्रमांकाच्या दुचाकीने गेले.भालगांव – बोरगांव रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने महाजन यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना एरंडोल येथे खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार होऊन तेथील डॉक्टरांच्या सुचनेवरून त्यांना जळगाव येथील न्युक्लिअस हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.त्यांचा डावा डोळा पुर्णपणे निकामी झाला असून त्यांच्या दोन्ही बाजुच्या ७ बरगड्या फ्रॅक्चर असून फुफ्फुस व यकृत यांना जिवीतास धोका पोहचेल अशा स्वरूपाच्या गंभीर इजा झालेल्या आहेत.तसेच त्यांच्या डोक्याला व मेंदूला देखील इजा झालेली आहे.त्यांचे दोन्ही पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहेत.विविध ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत.असे तपासणीत डॉक्टरांना आढळून आले.सध्या त्यांच्यावर तेथे उपचार होत असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ आहे.
या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अमळनेर विभागाचे डि वाय एस पी विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.तसेच एल सी बी पथक याप्रकरणाची कसून चौकशी करीत असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीदास गबाले, राजेश पाटील,अनिल पाटील, मिलिंद कुमावत, संदीप पाटील,हे पुढील तपास करीत आहेत.