-
*’अभिमान एरंडोल मातीचा सन्मान कर्तृत्वाचा’, खान्देशची मान उंचावणाऱ्या आयएएस आकाश त्रिवेदींचा ऐतिहासिक नागरी सत्कार, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न………!*

एरंडोल प्रतिनिधी – जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७३ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन करणाऱ्या एरंडोलचे सुपुत्र आकाश ओम त्रिवेदी यांचा गुरुवारी १९ मार्च २०२६ भव्य नागरी सत्कार करण्यात आला. ‘ अभिमान एरंडोलचा… सन्मान कर्तृत्वाचा ‘ या संकल्पनेखाली आयोजित या सोहळ्याने संपूर्ण खान्देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
एरंडोल शहर व तालुका गौरव समितीच्या वतीने दादासाहेब डिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आकाश त्रिवेदी व त्यांच्या पालकांचा ॲड. ओम त्रिवेदी आणि रेखा त्रिवेदी यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ ,शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल चिमणराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
”आकाशने घेतलेली ही ‘आकाश भरारी’ केवळ एरंडोलसाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे.”
— ना. गुलाबराव पाटील पालकमंत्री, जळगांव.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त आयएएस आकाश त्रिवेदी भावूक झाले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालकांच्या संस्कारांना दिले. “आजच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सोशल मीडियापासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करावी; मी स्वतः सोशल मीडियापासून लांब राहिल्यामुळेच हे यश संपादन करू शकलो,” असा कानमंत्र त्यांनी उपस्थित तरुणांना दिला.
” आकाश त्रिवेदी एरंडोल तालुक्यातून थेट जिल्हाधिकारी होणारे पहिले सुपुत्र ठरले आहेत.” आमदार अमोल पाटील यांनी हे यश आई-वडिलांचे संस्कार आणि कष्टाचे फळ असल्याचे प्रतिपादन केले.
या सोहळ्याला एरंडोल परिसरातील पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. मनोज पाटील यांनी मानले. नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकुर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रा. लोहार सर यांनी लेख सादर केला, या ऐतिहासिक सोहळ्याने एरंडोलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे
या सोहळ्याला माजी आमदार महेंद्र बापू पाटील, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,शोभाताई महाजन,रमेशसिंग परदेशी, किशोर निंबाळकर,रवींद्र महाजन,रमेश महाजन,विजय महाजन, जगदीश पाटील,डॉ.सुरेश पाटील,माजी नगरसेवक रुपेश महाजन व सर्व नगरसेवक नगरसेविका, मा. जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, मा. जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव तसेच एरंडोल परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी,पालक विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
