*एरंडोल तालुक्यात माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने केली अल्पवयीन मुलीची छेडखानी……!*
*शिक्षकी पेशाला काळीमा….!*एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात ग्रामीण भागातील एका माध्यमिक विद्यालयातील मंगेश हरी पाटील,वय ५५ वर्षे या शिक्षकाने शाळा चालू असताना शिक्षक दालनात १५ वर्षीय मुलीस बोलावून तिची छेडखानी केल्याची घटना मंगळवारी ११ मार्च २०२५ रोजी सकाळी घडली.सदर शिक्षकाच्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेला आहे.पवित्र अशा शारदेच्या मंदिरात शिक्षकानेच आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी केल्याच्या या घटनेमुळे गावासह तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी आरोपीवर एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दरम्यान आरोपी मंगेश पाटील या शिक्षकाला शोधण्यासाठी पाचोरा येथे पोलीस पथक रवाना झाले आहे.
एरंडोल तालुक्यातील एका ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यालयात आरोपी शिक्षक मंगेश हरी पाटील,रा.पाचोरा याने १५ वर्षीय विद्यार्थीनीस शिक्षक दालनात बोलावले व तिच्याशी छेडखानी करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद कृत्य केले.या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.दरम्यान अमळनेर विभागाचे डि.वाय.एस.पी विनायक कोते यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
बेटी बचाव बेटी पढाओ या शासनाच्या धोरणाला या घृणास्पद घटनेमुळे तडा गेल्याचे बोलले जात आहे.