- एरंडोल पोलीस ठाण्याचा हवालदार ३ हजार रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीच्या जाळ्यात…….!
एरंडोल प्रतिनिधी यांच्या- येथील पोलीस स्टेशन कर्मचारी बापू लोटन पाटील हा ३ हजाराची लाच स्विकारतांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाच्या जाळ्यात अडकला. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर धुळ्याला नेण्यात आले.
या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.एरंडोल पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्याकरिता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जळगांवहून एरंडोल येथे बदली होऊन आलेला पोलीस हवालदार बापू लोटन पाटील याने म्हसवे ता.पारोळा येथील तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. विशेष म्हणजे तक्रारदार हा स्वतः अपघातात जबर जखमी झालेला असतांनाही त्याचे कडून पैशांची अवास्तव मागणी करण्यात आली. तडजोडी अंती ३ हजार रुपयात प्रकरण मिटविण्याचे ठरले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार याने बापू पाटील याला दुरध्वनीद्वारे एरंडोल हायवे चौफुली येथे रक्कम घेण्यासाठी बोलावले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून बापू लोटन पाटील हा ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
जप्त केलेली दुचाकी परत मिळण्याकरिता पोलीस हवालदार बापू पाटील यांना विनंती करूनही त्यांनी पैशांसाठी जप्त केलेली दुचाकी परत देण्यास नकार दर्शविला.
याप्रकरणी रात्री उशीरा पर्यंत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.