- एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी ३०ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या दालनात छाननी सकाळी ११ वाजता सुरू होऊन जवळपास १२ वाजेपर्यंत छाननीची प्रक्रिया शांततेत पार पडली.यावेळी ३७ दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येऊन पैकी ४ अर्ज अवैध व ३३ अर्ज वैध घोषित करण्यात आले.वैधरित्या नामनिर्देशीत उमेदवारांची संख्या २० आहे.
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल मनोहर माने व याच पक्षाचे माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन यांनी पक्षाचा ए बी फाॅर्म सादर केलेला नाही या कारणावरून त्या दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध घोषित करण्यात आले.याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम मधुकर पवार यांच्या नामनिर्देशन पत्रावर आवश्यक १० प्रस्तावकांच्या स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.नामनिर्देशन पत्रावर १० प्रस्तावकांचे मतदार यादीचा भाग क्रमांक व त्या भागातील अनुक्रमांक याबाबत उल्लेख न करता त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत या त्रुटीमुळे अपक्ष उमेदवार संतोष दगडू गुरव यांचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याचे जाहीर करण्यात आले.
छाननी प्रसंगी अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन,दत्तू रंगराव पाटील,गोरख चौधरी, रविंद्र जाधव, आदी उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोल चे तहसीलदार प्रदीप पाटील, एरंडोल न.पा.चे मुख्याधिकारी अमोल बागुल,नायब तहसीलदार दिलीप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.