-
*एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीच्या भीषण अपघातात ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, साडूविरुद्ध गुन्हा दाखल……..!*
एरंडोल प्रतिनिधी – साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एरंडोल शहराजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात निशा डिगंबर पाटील या ७ वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी दुचाकी चालक दीपक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की जळगाव येथील डिगंबर भिका पाटील आणि त्यांचे साडू दीपक प्रभाकर पाटील (रा. मलकापूर) हे २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या दुचाकींनी धुळ्याकडे साखरपुड्यासाठी जात होते. दीपक पाटील यांच्या दुचाकी क्र एम एच २८ एक पी ८७७५ वर त्यांची पत्नी आणि फिर्यादी डिगंबर भिका पाटील यांची मुलगी निशा पाटील (वय ७ वर्षे ) हे बसलेले होते.सकाळी १० वाजेच्या सुमारास एरंडोल येथील बी.एस.एन.एल. टॉवरजवळ चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीने एका प्रभाकर जाधव या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने चिमुरडी निशा हिचा ४ मार्च रोजी उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.दुचाकी चालक दीपक पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.तर त्यांच्या पत्नीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
रस्त्याकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे फिर्यादी डिगंबर भिका पाटील यांनी आपला साडू दीपक पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
