- *नंदगांव शिवारात विद्यूत पोल सह तारांची चोरी, रब्बी पेरण्या धोक्यात………!*
एरंडोल प्रतिनिधी – येथील नंदगांव शिवारातील जवळपास २५ विद्यूत पोल सह तारा चोरीला गेल्यामुळे शेतीपंप बंदावस्थेत आहेत.त्यामुळे नंदगांव शिवारातील सुमारे २०० एकर शेतशिवारातील रब्बी पेरण्या धोक्यात आल्या आहेत.आधी सततचा पाऊस व मुसळधार पावसाळ्याच्या संकटामुळे खरीप हंगामावर पाणी फिरले.आता विजेच्या समस्येमुळे रब्बी पेरण्या होणे अशक्य झाले आहे.अशी तक्रार शेतकऱ्यांनी विजवितरण कंपनीकडे व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
नंदगांव शिवारात महूची डि पी वरून जवळपास ३५ ते ४० विद्यूत पंपाची जोडणी आहे.३ ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यूत खांब व विद्यूत तारा यांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली.या संदर्भात प्रशांत महाजन, सुखदेव मराठे,अरूण भोई,हिलाल फुलारी, सुभाष मराठे,दत्तू वाणी,दयास शेख, किशोर महाजन आदी शेतकऱ्यांच्या तक्रारी अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत.
ज्ञानेश्वर झोपडू महाजन यांची बैलजोडी व बैलगाडी लंपास करण्यात आलेली आहे.विजेचे खांब व अल्युमिनियमच्या तारा जोपर्यंत नवीन लावल्या जात नाहीत.तोवर शेतातील विज पंप सुरू होणे अशक्य आहे.त्यामुळे रब्बी पेरण्यांना विलंब होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आठवडाभरात शेतांमधील कृषी पंप सुरू न झाल्यास नंदगाव शिवारातील शेतकरी नंदगांव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करतील.असा इशारा देण्यात आला आहे.