Home » क्राईम » *पिंपळकोठा येथे शेतात गव्हाला पाणी भरायला गेलेला शेतकरी रानडूकराच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी……!*

*पिंपळकोठा येथे शेतात गव्हाला पाणी भरायला गेलेला शेतकरी रानडूकराच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी……!*

  1. *पिंपळकोठा येथे शेतात गव्हाला पाणी भरायला गेलेला शेतकरी रानडूकराच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी……!*


    एरंडोल ( प्रतिनिधी )
    तालुक्यातील पिंप्री बु.शिवारातील पिंपळकोठा रिंगणगांव रस्त्यापासून थोड्या अंतरावरील गट नं.७७११ या शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी हिरामण हसरथ हटकर वय ६० वर्षे,रा.पिंपळकोठा खु.या शेतकऱ्यावर रानडूकराने जीवघेणा हल्ला केला.ही घटना ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.या हल्ल्यात हिरामण हटकर या शेतकऱ्याच्या दोन्ही मांड्यांना चावा घेऊन अक्षरशः फाडल्या.त्यामुळे उजव्या मांडीला १४ टाके तर डाव्या मांडीला १२ टाके पडले असून सदर शेतकरी एरंडोल येथे एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहे.दरम्यान वन परिक्षेत्राचे अधिकारी डि.एस.पवार व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
    एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथील शेतकरी हिरामण हसरथ हटकर वय ६० वर्षे यांचे पिंप्री बु.शिवारात शेत असून शेतात गव्हाचे पिक आहे.३ मार्च २०२५ रोजी ते सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेले असता ज्या भागात पाणी सोडायचे होते त्याठिकाणी त्यांना गव्हाचे पिक आडवे पडलेले दिसले.ते जवळून पाहायला गेले असता लपून बसलेल्या रानडुक्कराला चाहूल लागताच त्याने हिरामण हटकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.त्यांनी आरडाओरडा केला असता त्यांचा मुलगा प्रविण धावत आला.तोवर रानडुक्कराने त्याच्यावरही हल्ला केला असता त्याने स्वतःचा बचाव केला.त्यावेळी रानडुक्कर शेजारच्या शेतात पळाले.त्याठिकाणी प्रितम हटकर वय २३ वर्षे याच्यावर सुध्दा रानडुक्कराने हल्ला चढवला.मात्र परिसरातील शेतकरी जमा झाल्यामुळे रानडुक्कराने पळ काढला.
    गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हटकर यांना दुचाकीने एरंडोल येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्या दोन्ही मांड्यावर टाके टाकण्यात आले.वन परीक्षेत्राचे अधिकारी डि.एस.पवार यांनी खाजगी रूग्णालयात जाऊन गंभीर जखमी शेतकऱ्याकडून घटनेची माहिती घेतली.
    दरम्यान या रानडुक्कराच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर रानडुक्कराला पकडून बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या