राज्य महामार्गालगत दुकाने किंवा हात गाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार.
एरंडोल:-येथे दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात व्यापारी विक्रेते दुकानदार व फेरीवाले यांनी धरणगाव चौफुली पासून म्हसावद नाक्यापर्यंत राज्य महामार्गालगत दुकाने लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा एरंडोल पोलीस स्टेशन प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे देण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार एरंडोल येथे तर रविवारी आठवडे बाजार हा मरी माता मंदिरापासून नथू बापू दर्गा नवीन बांधण्यात आलेला आठवडे बाजार ओट्याजवळ, म्हसावद नाका ते अंजनी नदी पात्रात भरतो परंतु मागील काही महिन्यांपासून सदर बाजार हा एरंडोल ते नेरी राज्य महामार्गावरील धरणगाव चौफुली ते म्हसावद नाक्यापर्यंत मुख्य रहदारीच्या रस्त्यावर भरत आहे. या मार्गावर अवजड वाहने व इतर वाहनांची वर्दळ असते तसेच ही वाहतूक अडविता येत नाही तसेच दुसऱ्या मार्गाने वळविता सुद्धा येत नाही त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने बाजार भरत असताना रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे मोठा गंभीर स्वरूपाचा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे.