- *समांतर रस्त्यालगतच्या गटारींचे बांधकाम दर्जेदार व युध्दपातळीवर करण्याची एरंडोल येथील व्यावसायिकांची मागणी……..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे पद्मालय प्राथमिक शाळेपासून एरंडोल बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत समांतर रस्त्यालगतच्या गटारींचे बांधकाम मजबूत व दर्जेदार तसेच विलंब न लावता सातत्याने करावे.अशी येथील व्यावसायिकांनी मागणी केली आहे.तर दुसरीकडे गटारींचे बांधकाम अर्धवट राहू दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा काही सामाजिक संस्थांनी दिला आहे.
एरंडोल येथे सध्या समांतर रस्त्यालगत महामार्गावरील पाण्याचा निचरा होण्याकरिता गटारींचे बांधकाम सुरू आहे.मात्र पद्मालय प्राथमिक शाळेपासून बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या भागात गटारीचे बांधकाम वादाच्या विळख्यात सापडले आहे.हे काम न झाल्यास पावसाचे पाणी इमारती व दुकानांमध्ये शिरून मोठमोठी डबकी तयार होतील.त्यामुळे रोगराई पसरून नागरी आरोग्य धोक्यात येऊ शकते.तसेच इमारतींना धोका होऊ शकतो.या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेऊन गटारींचे बांधकाम त्वरित होणे आवश्यक आहे.अन्यथा महामार्ग समस्या निवारण कृती समिती आंदोलनात्मक पावित्रा घेणार आहे.गरज पडल्यास महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्त घेऊन सदर गटारींचे बांधकाम करावे.अशी मागणी पुढे येत आहे.तसेच या परिसरातील समांतर रस्ता कमी रूंदीचा असल्यामुळे वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.तरी सदर समांतर रस्ता रूंद करण्यात यावा.अशी अपेक्षा आहे.एकंदरीत अवघ्या ५०० मीटरचा हा परिसर नेहमी गजबजलेला व वर्दळीचा असल्याने याठिकाणी समांतर रस्त्याची रुंदी वाढवून त्यालगत गटारीचे बांधकाम ही काळाची गरज आहे.असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.
