-
*एरंडोल धरणगाव महामार्गावर धुळीचा पसारा, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे तीन तेरा…….!*
एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल ते धरणगांव या राज्य महामार्गाच्या रूंदीकरणासह काॅंक्रीटीकरणाच्या कामासाठी टोळी गावापासून कमल लाॅन्स पर्यंत रस्त्याची एक बाजू खोदण्यात आली आहे.तर रस्त्याचा उरलेला भाग व रूंद केलेला कच्चा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.मात्र या रस्त्यावर उखडलेली खडी, माती व धुळीचे लोट यांना सामोरे जाऊन सर्व वाहनांची वाहतूक सुरू आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विशेष हे की रस्ता एका बाजूला खोदण्याचे काम झाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांपासून काम बंद असल्याचे दिसून येते.
एरंडोल धरणगांव या मार्गाची लांबी अवघ्या १२ कि.मी.ची असून या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते.प्रत्येक वाहन रस्त्यावर जातांना धुळीचे लोट उठत असल्यामुळे वाहतूक करणे कमालीचे धोक्याचे झाले आहे.अवघ्या १२ कि.मी.च्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी पुर्वी २० मिनिटे लागत असत.मात्र आता धुळीचे लोट उठवत प्रत्येक वाहनाला एक तास लागतो.एरंडोल ,टोळी,बांभोरी व पंचक्रोशीतील गावांचे शेतकरी रात्री बेरात्री या मार्गाने शेतात ये जा करतात.एकंदरीत या मार्गावरील प्रवास म्हणजे ‘ जीवाला धोका आणि अपघाताला मोका ‘ असा प्रकार सुरू आहे.
एका बाजूने वाहतूक सुरू असून खड्डे,उंचवटे व खडी उडवत वाहने तारेवरची कसरत करत मार्ग काढीत आहेत.दुचाकी वाहने घसरून अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत.रहदारी एका बाजूने सुरू असल्यामुळे वाहनांच्या ठिकठिकाणी रांगा लागत आहेत.परिणामी प्रवासी व वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत.कच्च्या रस्त्यावर टॅंकर द्वारे पाणी टाकण्याची गरज आहे.ही सुविधा दिवसातून सकाळी, दुपारी व संध्याकाळी करण्यात यावी.अशी मागणी जोर धरत आहे.
रस्ता अपुरा असल्यामुळे प्रवास धोकेदायक, प्रवाशांच्या आरोग्याला धोका,वाहनांचे नुकसान,वेळेचा अपव्यय इत्यादी प्रकार सुरू आहेत.दिवसा धुळ तर रात्री अंधार यामुळे प्रवास जीवघेणा झाला आहे.म्हणून रात्री रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात प्रकाश योजना व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून द्यावी.असे सुजाण नागरिकांचे मत आहे.
काही दिवस काम बंद ठेवणे अन् कासवगतीने काम सुरू ठेवणे याप्रकारे रस्त्याचे काम जर लांबणीवर पडले तर अपघाताचे प्रमाण वाढून निष्पाप लोकांना अवयव गमवावे लागतील किंवा प्राणाला मुकावे लागेल.याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार व या कामावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा हे जबाबदार राहतील.असा इशारा नागरिकांनी दिला आहे.