-
*शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला ९४.३ माय एफएमचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार*
प्रतिनिधी – समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ९४.३ माय एफएमतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार यंदा शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (आयपीएस) यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांना प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अल्पावधीत केलेले उल्लेखनीय शैक्षणिक कार्य, तसेच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने केलेले योगदान आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची दखल घेत ९४.३ माय एफएमतर्फे हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत सकारात्मक विचार, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सांस्कृतिक जाणीव पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली असून सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण झाला आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी सातत्याने योगदान देत कला, साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी भरीव कार्य केले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ९४.३ माय एफएमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून समाजासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची पावती असल्याचे सांगितले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून दर्जेदार व मूल्याधिष्ठित उच्च शिक्षण देण्याचे अविरत कार्य शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे सुरूच राहील, असे डॉ. विजय शास्त्री यांनी नमूद केले. या यशात योगदान देणाऱ्या सर्व सहकारी, मार्गदर्शक, शुभेच्छुक आणि कुटुंबीयांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जळगाव जिल्ह्यासाठी हा गौरवाचा व अभिमानाचा क्षण ठरला आहे.
