- *पारोळा महामार्गावर डिझेल टॅंकर चालकाने केली २२ लाख रुपये किंमतीच्या डिझेलची चोरी………!*
एरंडोल प्रतिनिधी – पारोळा महामार्गावर भालगांव शिवारातील आनंद हाॅटेल परिसरात डिझेल टॅंकर चालकाने टॅंकर थांबवून २२ लाख रुपये किंमतीचे अंदाजे ३० हजार लिटर डिझेलचा अपहार केल्याची घटना १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला २० जानेवारी २०२६ रोजी डिझेल टॅंकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बी आर सी ट्रान्सलाईन,गांधीधाम, गुजरात द्वारे वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंपांना डिझेल पुरविले जाते.जी जे ३९ टी ९९८२ क्रमांकाच्या टॅंकरमध्ये ३३ हजार लिटर डिझेल भरून यवतमाळ येथे पोहचवण्यासाठी डिझेल टॅंकर चालक भुराराम काळूराम या चालकाला १३ जानेवारी २०२६ रोजी पाठविण्यात आले.सदर टॅंकर १६ जानेवारी रोजी पोहचणे अपेक्षित असतांना तो त्या ठिकाणी पोहचला नाही.ट्रान्सलाईनच्या मॅनेजरने याबाबत एरंडोल व जळगावकडे येऊन चौकशी केली असता सदर चालकाने डिझेलची चोरी केल्याचे आढळून आले.
सविस्तर वृत्त असे की चालकाने गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही तपासात समोर आले आहे.आनंद हाॅटेल येथील लोकांनी सांगितले की १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास डिझेलने भरलेला टँकर क्र. जी जे ३९ /टी ९९८२ आनंद हॉटेल परिसरात आला होता. ” खूप थकलो आहे, आराम करायचा आहे ” असे सांगून चालक भूराराम याने टँकर हॉटेलच्या आवारात लावला. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास या टँकरमधून दुसऱ्या एका टँकरमध्ये डिझेल चोरीचा व्यवहार सुरू होता.तांत्रिक तपासाअंती आणि जीपीएस डेटावरून असे दिसून आले की सदर टँकर मध्यरात्री १२.३५ ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत हॉटेल परिसरात उभा होता. याच काळात डिझेलची अफरातफर करण्यात आली. चोरी लपवण्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तरसोद फाट्याजवळ चालकाने टँकरचा जाणीवपूर्वक अपघात घडवून आणला.
पुढील तपास एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार हे करीत आहेत.
