- रिंगणगाव येथे ग्रामस्थांनी घेतली शोक सभा.
महिलांच्या सभेत तेजसला श्रद्धांजली.एरंडोल प्रतिनिधी :- तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस या १३ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी येथे बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेत शोक सभा आयोजित करून तेजस ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाहेर गावाहून शेती कसण्यासाठी व रोजगारासाठी आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबांना गावातून तातडीने हाकलून देण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असाही निर्णय घेण्यात आला.
शोकसभा आटोपल्यानंतर मोठ्या समूहाने गावातील घटनास्थळावर संशयित आरोपींच्या झोपड्यावर धाव घेतली मात्र गावात पोलीस बंदोबस्त चोख असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जमावाला शांत केले. त्यामुळे अनर्थ टळाला. घटनास्थळी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. घटनेच्या दुसऱ्या दिवशीही गावात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला दरम्यान बुधवारी काही प्रमाणात बाजारपेठ सुरू झाली होती. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
बाहेर गावाहून रोजगारासाठी आलेल्या लोकांचे आधार कार्ड व कागदपत्र तपासावे अशी मागणी पिंपळकोठा प्र.चा. येथील तरुणांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन केली.
या शोकसभेत सरपंच भानुदास पुंडलिक मते , गजानन महाजन माजी सरपंच प्रकाश तांदळे, मेघराज महाजन ,वासुदेव मोरे, नामदेव तुकाराम पाटील, रमेश घुले ,नकुल सपकाळे ,भरत महाजन ,रामदास जाधव ,गणी पटेल ,ज्ञानेश्वर माळी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
बुधवारी सायंकाळी रिंगणगाव येथील महिलांनी शोकसभा घेऊन तेजसला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिलांनी तेजस चा खून करणाऱ्या नराधमांचा तीव्र शब्दात धिक्कार केला. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली. गावात बाहेर गावाहून जमीन करण्यासाठी व शेतमजुरीसाठी आलेल्या कुटुंबांना गावातून लगेच हद्दपार करावे अशी मागणी ही करण्यात आली. यावेळी माजी सरपंच प्रकाश तांदळे व माजी उपसरपंच भरत महाजन व इतर महिलांनी आपले संतप्त मनोगत व्यक्त केले.