-
*मानधनाची रक्कम कर्मवीर अभ्यासिका व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा एरंडोल न.पा.चे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ.गीतांजाली ठाकूर या दांपत्याचा प्रेरणादायी निर्णय………!*

एरंडोल प्रतिनिधी – येथे नगरपालिकेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व त्यांच्या धर्मपत्नी तथा नगरसेविका गीतांजली ठाकूर यांनी शासकीय मानधनाची संपूर्ण रक्कम नगरपालिका संचलित कर्मवीर अभ्यासिका विकसित करण्यासाठी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांकरीता वापरण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.या संदर्भात ठाकूर दांपत्याने मुख्याधिकारी अमोल बागुल यांना पत्र देऊन एक नवा आदर्श पायंडा घातला आहे.या त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम १९६५ ( ६१/१) च्या तरतूदीनुसार नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांना दरमहा १५ हजार रुपये मानधन शासनाकडून देय आहे.तर नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर यांना नगरपालिकेच्या प्रत्येक बैठकीसाठी शासनाकडून भत्ता देय आहे.
एरंडोल येथे पायाभूत विकासकामांचा शुभारंभ नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नियोजित करण्यात येत आहे.पाणीपुरवठा वेळेवर व व्यवस्थीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.स्वच्छता अभियानालाही सुरूवात झालेली आहे.एरंडोल नगरपालिका ‘ क ‘ वर्गाची असून निधीची रक्कम तुटपुंजी व उत्पन्नाची साधने अत्यल्प असल्याने नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.हे निदर्शनास आल्यामुळे डॉ.नरेंद्र ठाकूर यांनी शासकीय मानधनाची रक्कम स्वतःकडे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
