-
*रिंगणगाव येथे ‘ महाराजस्व समाधान शिबीर ’ उत्साहात, एकाच छताखाली शेकडो नागरिकांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ……….!*

एरंडोल – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ‘ गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरण ’ योजनेअंतर्गत, रिंगणगाव मंडळ येथे ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ’ अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विभागांच्या शासकीय सेवा थेट ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात आल्या.ज्याचा लाभ परिसरातील सुमारे १ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी घेतला.शिबिराचे उद्घाटन एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार अमोल बन, निवासी नायब तहसीलदार संजय घुले, विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुकास्तरीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार गोपाळ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ” शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.” प्रशासनाने राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
शिबिरामध्ये विविध विभागांनी आपले स्टॉल्स लावून नागरिकांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही केली. वाटप करण्यात आलेल्या लाभांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) पुरवठा विभागातर्फे ४७ नवीन/दुबार शिधापत्रिका व अन्न सुरक्षा लाभ.
२) सेतू विभागातर्फे १५७ उत्पन्न दाखले, ८७ राष्ट्रीयत्व, ५७ रहिवासी आणि २७ जातीच्या दाखल्यांचे वाटप.२२ आधार नोंदणी,२२ आधार कार्ड सुधारणा.
३)संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे १२५ लाभार्थ्यांची डी बी टी प्रक्रिया पूर्ण, ९६ हयात प्रमाणपत्रे आणि १२ नवीन अर्ज.
४) तालुका आरोग्य विभागातर्फे जननी सुरक्षा ६ लाभार्थ्यांना लाभ वाटप.
५) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ५ लाभार्थ्यांना लाभ वाटप.
६) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ४ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप.
७) बालविकास विभागातर्फे ४ बेबी कीट वाटप.
८) कृषी विभागातर्फे महाडीबीटी अंतर्गत ४ लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व मशिनरी वाटप, २ लाभार्थ्यांना फळबाग लागवड लाभ.
९) गोपीनाथ मुंडे अपघात विमा लाभ २ लाभार्थी.
१०) पंचायत समिती तर्फे २ जलतारा योजना मान्यता.
११) संजय गांधी योजना ५ लाभार्थ्यांना लाभ.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नायब तहसीलदार अमोल बन आणि संजय घुले यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रिंगणगावचे मंडल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
