-
” मोबाईलच्या विडख्यात अडकलेल्या तरुणाईला वाचन संस्कृती कडे वळवण्यासाठी “
-
*मानवतावादी विचारवन्त डॉ.म.सु.पगारे यांचे ग्रंथदान*
-
-
बहाळ : मोबाईल या घटकामुळे विद्यार्थी वर्ग वाचनापासून लांब चाललाय. वाचन संस्कृतीने अनेक विदवत व प्रज्ञावन्त समाजाला दिले असून त्यामुळे समाज सुजाण व सजग झाल्याचे सर्वश्रुत आहे.मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या वर्तमान पिढीतल्या तरुणांमध्ये वाचनाभिरुची रुजू करावी या दुरदृष्टीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रोफेसर डॉ.म.सु.पगारे यांनी बहाळ ता.चाळीसगाव येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयास ८६००० रुपये किमतीची ३८१ वैविध्यपूर्ण पुस्तके ग्रंथदानाच्या माध्यमातून काल दि.३१.३.२०२६ रोजी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.शिवराम चौधरी यांना सुपूर्त केलीत.यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री.भीमराव बोरसे ,सचिव पी.एस.करंकाळ, दुय्यम सचिव श्री.संतोष भोई यांचेसह संचालक मंडळाची उपस्थिती होती.
डॉ.पगारे यांचे माध्यमिक शिक्षण बहाळ येथे झाले असल्याने गावाचे मी देणे लागतो.या कृतज्ञ भावनेने वर्तमान पिढीसाठी व येणाऱ्या पिढ्यांसाठी केलेले हे विपुल ग्रंथदान गावकऱ्यांना भारावणारे होते.
स्वतः डॉ.म.सु.पगारे हे सिद्धहस्त लेखक,समीक्षक,संशोधक,कवी तथा द्रष्टे वक्ता म्हणून महाराष्ट्रास परिचित आहेत.त्यांनी आजवर साठ ग्रंथांचे लेखन केले असून अनेक विद्यापीठात त्यांच्या ग्रंथांवर पीएच.डी सुद्धा झालीय.इटली,व्हेनिस,मलेशिया,दुबई,पुणे येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.त्यांच्या बा, तथागता या विशाल मराठी कवितेची हिंदी,इंग्रजी व अहिराणी भाषेत अनुवाद झाले असून त्यावरचे समीक्षा ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. एका ज्ञान तपस्व्याने ऋणाईत होऊन आपल्या गावाला दिलेले हे ग्रंथदान अखिल मानवतेला
गवसणी घालणारे असून बहाळ येथील ग्रामस्थ आणि साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या संचालक मंडळाने याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केलेय.
यावेळी एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे,संशोधक विद्यार्थी कैलास पाटील, संशोधक विद्यार्थी अस्मादिक पगारे यांचीही उपस्थिती लाभली.

