- *जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रिंगणगावच्या योगिता पाटीलची ‘ मुंबई पोलीस ‘ दलात झेप,आमदार अमोल पाटील यांच्याकडून ‘ शिवप्रतिमा देऊन सत्कार………..!*
![]()
![]()
रिंगणगाव प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत व जिद्दीच्या जोरावर प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. हे एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील योगिता संतोष पाटील हिने दाखवून दिले आहे. फेब्रुवारी २०२६ च्या पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश मिळवून तिची ‘ मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ‘ पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते योगिताला ‘ शिवप्रतिमा ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
योगिताने जळगावच्या एम. जे. कॉलेजमधून बी.कॉम. पूर्ण केले असून, सध्या ती मणियार लॉ कॉलेजमध्ये एलएलबी प्रथम वर्षात शिकत आहे.घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही तिने खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम व अभ्यासाच्या जोरावर हे यश खेचून आणले. ती एक उत्कृष्ट खेळाडू असून तिने एनसीसी कॅडेट म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली असली तरी भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ‘ पोलीस अधिकारी ‘ बनण्याचा तिचा ठाम निर्धार आहे.
योगिताच्या या यशाबद्दल रिंगणगावात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते आबा मते, साहेबराव पाटील, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, पंकज मराठे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



