Home » महाराष्ट्र » साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) प्रकल्पाची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित कामे एका वर्षात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..

साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) प्रकल्पाची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित कामे एका वर्षात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..

  1. साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) प्रकल्पाची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; उर्वरित कामे एका वर्षात पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..

     

    एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत मोठी वाढ घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी साठवण तलाव पद्मालय (पद्मालय धरण-२) उपसा सिंचन योजनेची आज आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या योजनेअंतर्गत सिंचन क्षेत्रातील १९८२ हेक्टर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ६५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली होती. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत क्षेत्रीय पाहणी केली.

    यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. गोकुळ महाजन यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पद्मालय-२ उपसा सिंचन योजनेअंतर्गत ७०.३६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याचे नियोजन असून एरंडोल व धरणगाव तालुक्यातील ३३ गावांमधील सुमारे ९,००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सुमारे २,००० हेक्टर क्षेत्रासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर उर्वरित ७,००० हेक्टर क्षेत्राला गिरणा प्रकल्पाअंतर्गत अस्तित्वात असलेल्या पारंपरिक उघड्या कालवा वितरण व्यवस्थेद्वारे सिंचन केले जाणार आहे.

    प्रकल्पाअंतर्गत गिरणा नदीवरील अस्तित्वात असलेल्या दहिगाव बंधाऱ्यातून पावसाळ्यात पाणी उपसा करून ते पद्मालय गावाजवळील स्थानिक नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या पद्मालय-२ माती धरणात साठविण्यात येणार आहे. या धरणाची लांबी २,२०० मीटर तर कमाल उंची ३८.३८ मीटर आहे. सध्या माती धरणाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उपसा प्रणाली व वितरण प्रणालीची कामे प्रगतीपथावर आहेत. उपसा प्रणालीअंतर्गत पंपगृहाचे काम सुरू असून उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

    यावेळी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली, वितरण जाळे, रस्ता क्रॉसिंग, नाला क्रॉसिंग, पाणी वापर संस्था इमारती तसेच इतर अनुषंगिक कामांचा सविस्तर आढावा घेतला. कामाची गुणवत्ता अबाधित राखत येत्या एका वर्षात संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करून काम वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

    यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पास रु. १०७२.४५ कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त असल्याची माहिती दिली. यावर आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी धरणाची घळभरणी, उपसा प्रणाली, बंदिस्त वितरण प्रणाली तसेच उर्वरित सर्व कामांना गती देऊन चालू वर्षातच महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे क्षेत्रीयस्थळी संबंधित विभाग व कंत्राटदारांना निर्देश दिले.

    या प्रकल्पामुळे १९८२ हेक्टर क्षेत्रात आधुनिक बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे अधिक कार्यक्षम सिंचन सुविधा उपलब्ध होणार असून पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पाणी थेट शेतापर्यंत पोहोचणार असल्याने बाष्पीभवन व गळती कमी होऊन सिंचनाची कार्यक्षमता वाढेल, तसेच कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होईल.

    याशिवाय शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि सिंचनाचा खर्च कमी होण्याबरोबरच पिकांची उत्पादकता वाढण्यास, वर्षभर विविध पिके घेण्यास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार आहे. शेती अधिक आधुनिक, शाश्वत व जलसंपन्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प एरंडोल व धरणगाव परिसरातील कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

    याप्रसंगी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, उपअभियंता आरती सुर्यवंशी, कंत्राटदार मनोज शर्मा, कंत्राटदार प्रतिनिधी कुणाल बोरसे, अभियांत्रिकी सहाय्यक अमोल सुर्यवंशी, मा.जि.प. सदस्य भिकाभाऊ कोळी, युवासेना मा.तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळीचे सरपंच बाळासाहेब पाटील, रिंगणगावचे सरपंच आबा मते, गालापूरचे सरपंच आरिफदादा तसेच खडके बु. येथील गोटू पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या