Home » सामाजिक » जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष

जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष

  1. जामनेरमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भक्तिमय जल्लोष

    जामनेर प्रतिनिधी —   श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त इस्कॉन भुसावळ व जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत बाबाजी मंगल कार्यालय, जामनेर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्यास सुमारे दोन हजारांहून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेतला.

    याप्रसंगी सौ. साधनाताई गिरीशभाऊ महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. इस्कॉन जामनेरच्या वतीने त्यांचा श्रीश्री राधा मुरलीधर यांचे सुंदर फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला. भुसावळच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

    महोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीश्री राधा मुरली मनोहर यांचा भव्य अभिषेक सोहळा. विविध नैसर्गिक फळे, पुष्पे व अन्य पवित्र द्रव्यांसह २५ नैसर्गिक घटकांनी अभिषेक करण्यात आला. भक्तांच्या श्रद्धा, प्रेम आणि सेवाभावाने संपूर्ण वातावरण कृष्णमय झाले.

    यावेळी इस्कॉन भुसावळच्या युवा भक्तांची हरिनाम संकीर्तन पार्टी विशेष आकर्षण ठरली. मधुर व उत्साहपूर्ण हरिनाम संकीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “हरे कृष्ण, हरे कृष्ण…” या महामंत्राच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

    महोत्सवासाठी इस्कॉन भुसावळच्या युवा भक्तांनी विशेष सुरक्षा व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत सुरळीतपणे पार पडले.

    श्रीश्री राधा युगल किशोरजींची मनोहारी सजावट भाविकांसाठी नेत्रसुखद ठरली. भक्तांनी प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या तब्बल १५६ प्रकारच्या भोगांचा श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. भक्तांच्या प्रेम, श्रद्धा आणि सेवाभावाचे हे सुंदर दर्शन यानिमित्ताने घडले.

    याशिवाय इस्कॉन गोपाल फन स्कूलच्या बालभक्तांनी सादर केलेली सुंदर राधा-कृष्ण लीला व गीत उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. चिमुकल्या भक्तांच्या निरागस सादरीकरणाने वातावरणात बालकृष्णाच्या लीलांचा आनंद अनुभवायला मिळाला.

    कार्यक्रमानंतर भाविकांनी स्वादिष्ट महाप्रसादाचा भक्तिभावाने आस्वाद घेतला. जामनेर शहरासह परिसरातील विविध गावांमधून आलेल्या भाविकांनी या महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

    श्रीकृष्ण जन्माष्टमी हा केवळ उत्सव नसून भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य अवतरणाची, प्रेमाची, भक्तीची आणि धर्माची अनुभूती देणारा मंगल सोहळा आहे. जामनेरमध्ये झालेल्या या भव्य जन्माष्टमी महोत्सवातून “वृंदावनाची अनुभूती जामनेरमध्ये” अशीच भक्तिमय अनुभूती उपस्थितांना मिळाली.

    इस्कॉन जामनेरच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाने जामनेर परिसरात भक्ती, संस्कृती आणि हरिनाम संकीर्तनाचा दिव्य संदेश पोहोचविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

*परंपरेचा वारसा अन् भक्तीचा जल्लोष, एरंडोलमध्ये मरिमाता चौक मित्र मंडळाची भव्य दहीहंडी उत्साहात साजरी………….!* ​ *आमदार ऍड.अमोल पाटील यांच्या हस्ते दहीहंडी व श्रीकृष्णाचे पूजन,शहरात गोविंदांचा अभूतपूर्व उत्साह…………!*