-
एरंडोल येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी
एरंडोल प्रतिनिधी- येथे माहेश्वरी समाजाचा स्थापना दिवस असलेल्या महेश नवमी निमित्त एरंडोल शहर व तालुका माहेश्वरी सभेतर्फे धार्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान शिव यांच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी सामाजिक एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला.
त्यानंतर रा. ती. काबरे विद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समाज बांधवांनी वृक्षारोपण केले. या प्रसंगी जळगाव जिल्हा माहेश्वरी सभेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच एरंडोल बसस्थानक परिसरात जलसेवा उपक्रम राबवून प्रवासी व नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
संध्याकाळी भगवान महेश यांच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेनिमित्त शहराच्या प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात व जयघोषात शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. त्यानंतर भगवान महेश यांची महाआरती संपन्न झाली.
कार्यक्रमाचा समारोप भोजन प्रसादीने करण्यात आला. दिवसभर आयोजित विविध उपक्रमांमध्ये समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महेश नवमी निमित्त आयोजित धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात एकात्मता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी व सेवा भावनेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एरंडोल शहर व तालुका माहेश्वरी सभेच्या सर्व समाज बांधवांनी राजस्थानी महिला मंडळ सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
एरंडोल येथे माहेश्वरी समाजातर्फे महेश नवमी उत्साहात साजरी
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप………..!*
July 26, 2026
8:15 pm

