-
*पुण्यात ‘ आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा ‘ चा दिमाखदार सोहळा संपन्न,४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे प्रदर्शन…………!*
*एरंडोलचे व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा पुण्यात सन्मान,उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते गौरव……….!**
एरंडोल ( प्रतिनिधी )–
जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून कार्टून कंबाईन्स संस्था व युवा संवाद सामाजिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा ‘ चे गुरुवारी ७ मे २०२६ रोजी बालगंधर्व कलादालन येथे उत्साहात उद्घाटन झाले. ४२ देशांतील १५० हून अधिक कलाकारांच्या सुमारे ३०० व्यंगचित्रांचे हे प्रदर्शन पुणेकरांसाठी खुले झाले असून, याद्वारे सामाजिक वास्तवावर मिश्किल आणि टोकदार भाष्य करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन उबाठा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी एरंडोल येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी सकाळ ॲग्रोवनचे व्यंगचित्रकार लहू काळे ,श्रीपाद पालकर, अरविंद देशपांडे, रवींद्र बाळापुरे, सोमेश्वर गजमल, सिद्धार्थ नागठाणकर, सुहास पालीमकर, आशिष विखार, योगेश चव्हाण,गिरीश पाटील आदींचा व्यंगचित्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला ‘ कार्टुनिस्टस् कम्बाईन ‘ चे अध्यक्ष गौरव सर्जेराव, उपाध्यक्ष अमित पापळ, खजिनदार उदय मोहिते, मुख्य समन्वयक किशोर शितोळे, आयोजक धनराज गरड, बाळासाहेब धोका, शशिकांत कांबळे यांसह कला क्षेत्रातील दिग्गजांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
”व्यंगचित्रकार हा संवेदनेचा जागत पहारा” – सुषमा अंधारे
उद्घाटनपर भाषणात सुषमा अंधारे यांनी व्यंगचित्रकारांच्या निष्ठेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या.” व्यंगचित्रकार कमीत कमी शब्दांत आणि मोजक्या रेषांतून मोठा आशय मांडतो. राजाश्रय नसला तरी सत्याची बाजू मांडणारा तो खरा कलाकार असतो. आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता स्वातंत्र्य आव्हानात्मक असताना व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून सामाजिक संवेदनशीलता जिवंत ठेवत आहेत.”
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही आजच्या काळात ही कला जिवंत ठेवणे काळाची गरज असल्याचे सांगत, व्यंगचित्रांमधील समाज परिवर्तनाची ताकद अधोरेखित केली.
यावेळी ‘कार्टुनिस्टस् कम्बाईन’चे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी पुण्यात व्यंगचित्रकारांच्या हक्काचे ‘ व्यंगचित्र भवन ‘ उभे राहावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
सदर व्यंगचित्र प्रदर्शन ७ मे ते ९ मे २०२६ पर्यंत व्यंगचित्रप्रेमींसाठी व रसिकांसाठी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोर शितोळे यांनी मानले. जागतिक स्तरावरील ही कलाकृती पाहण्यासाठी पुणेकर रसिकांनी मोठी गर्दी केली आहे.


